यशवाडी हनुमान मंदिरात भीषण दुर्घटना; सभामंडपाचे बांधकाम कोसळून ५ भाविकांचा मृत्यू
परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील यशवाडी येथील
प्रसिद्ध त्रिमूर्ती हनुमान मंदिरात शनिवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. मंदिर
परिसरात सुरू असलेल्या सभामंडपाच्या बांधकामाचा स्लॅब अचानक कोसळल्याने अनेक भाविक
ढिगाऱ्याखाली अडकले. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार ५ भाविकांचा मृत्यू झाला
असून २० ते २५ जण जखमी झाले आहेत.
मानवत–परभणी राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हा शिवारात
असलेल्या यशवाडी येथील त्रिमूर्ती हनुमान मंदिराला धार्मिक दृष्ट्या विशेष महत्त्व
आहे. प्रत्येक शनिवारी या मंदिरात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात.
मंदिराच्या विस्तारासाठी गाभारा आणि सभामंडपाचे बांधकाम सुरू होते. शनिवारी दुपारी
सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास दर्शनासाठी मोठी गर्दी असताना बांधकामाचा काही भाग
अचानक कोसळला. दगडी बांधकामाचा मोठा भाग भाविकांवर पडल्याने अनेक जण ढिगाऱ्याखाली
अडकले. दुर्घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. घटना घडताच उपस्थित नागरिक आणि
भाविकांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले. त्यानंतर प्रशासन, पोलीस, आपत्कालीन पथके आणि वैद्यकीय यंत्रणा
घटनास्थळी दाखल झाली. मानवत, परभणी, सेलू
आणि पाथरी येथून रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या असून जखमींना उपचारासाठी विविध
रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.
प्रशासनाकडून ढिगारा हटविण्याचे आणि अडकलेल्या भाविकांना
बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर
असल्याची माहिती समोर येत असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, सभामंडपाचे बांधकाम कोसळण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून
प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली आहे.