कमी दरात साखरेचे आमिष; हातनूरच्या व्यापाऱ्याची 9.16 कोटी रुपयांची फसवणूक

सांगली जिल्ह्यातील हातनूर (ता. तासगाव) येथील व्यापारी आशिष आनंदराव पाटील यांची 9 कोटी 16 लाख 25 हजार 99 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याकडून निविदा दरापेक्षा कमी दरात साखर मिळवून देण्याचे आमिष दाखवत हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आशिष पाटील आणि विशाल पाटील यांची विटा येथील अन्नपूर्णा ट्रेडिंग ही भागीदारीतील कंपनी असून ते साखर खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. डिसेंबर 2022 ते मे 2023 या कालावधीत दीपक मोरे, राजीव मोरे, अक्षय पाटील आणि अभिजित माने यांनी कारखान्यातून कमी दरात साखर पुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यावर विश्वास ठेवून आशिष पाटील यांनी वेळोवेळी मोठ्या प्रमाणात रक्कम बँक खात्यांद्वारे जमा केली. मात्र प्रत्यक्षात साखर पुरवठा करण्यात आला नाही. उलट कारखान्याच्या नावाने बनावट ई-वे बिल आणि जीएसटी बिले तयार करून कागदोपत्री साखर पुरवठा झाल्याचे दाखविण्यात आले. फसवणुकीची रक्कम परत देण्याबाबत संशयितांनी अनेक वेळा करारपत्रे आणि प्रॉमिसरी नोटरी करून दिल्या. तसेच नंतर दिलेले धनादेशही बँकेत वटले नाहीत. याबाबत विचारणा केल्यानंतर फिर्यादीला खोट्या ॲट्रॉसिटी आणि खंडणीच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणी दीपक नेताजीराव मोरे, राजीव नेताजीराव मोरे, अक्षय अनिल पाटील, अभिजित हणमंत माने यांच्यासह विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्याविरोधात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी फसवणूक, विश्वासघात, बनावट कागदपत्रांचा वापर आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला असून या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक विश्वजित काळे करीत आहेत.