खासदार प्रणिती शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश; तिलाठी रेल्वे गेटवर ओव्हरब्रिज व अंडरपास मंजूर
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिलाठी (इंगळगी) येथील रेल्वे
गेटवरील वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या
पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. रेल्वे विभागाकडून येथे रेल्वे ओव्हरब्रिज आणि
अंडरपास रस्त्याला मंजुरी देण्यात आली असून प्रकल्पाच्या कामाची संबंधित
अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. तिलाठी (इंगळगी) रेल्वे गेट हा
परिसरातील दहा ते पंधरा गावांतील नागरिकांसाठी महत्त्वाचा मार्ग मानला जातो.
रेल्वेची सतत ये-जा होत असल्याने गेट वारंवार बंद ठेवावे लागत होते. त्यामुळे
वाहतूक कोंडी, वेळेचा अपव्यय आणि नागरिकांची मोठी
गैरसोय होत होती.
ग्रामस्थांच्या या समस्येची दखल घेत खासदार प्रणिती शिंदे
यांनी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी रेल्वे विभागाकडे निवेदन सादर करून येथे ओव्हरब्रिज
आणि अंडरपास उभारण्याची मागणी केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर
या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे.
सुमारे साठ ते सत्तर कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे
तांत्रिक नकाशे सध्या रेल्वे प्राधिकरण आणि राज्य शासनाच्या मंजुरी प्रक्रियेत
आहेत. प्रकल्पाचे काम लवकर सुरू व्हावे यासाठी संबंधित विभागांमध्ये समन्वय
ठेवण्याच्या सूचना खासदार प्रणिती शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी रेल्वे गती शक्ती विभागाचे मंडल अभियंता आशिष साहू, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता अनिस खैरदी तसेच सार्वजनिक
बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे उपस्थित होते. या प्रकल्पामुळे
परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित, जलद आणि सुलभ होणार असून
ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे.