नाशिक विधान परिषद निवडणुकीत मोठा उलटफेर; अपक्ष गोकुळ गीतेंचा विजय, नरेंद्र दराडेंना पराभव

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला. शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी दमदार विजय मिळवला. या निवडणुकीत महायुतीकडे संख्याबळ अधिक असल्याचे मानले जात होते. त्यामुळे नरेंद्र दराडे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. मात्र निकालाने सर्व राजकीय अंदाज फोल ठरवत गोकुळ गीते यांनी पहिल्याच फेरीत विजयाचा कोटा पार केला. मतमोजणीदरम्यान विजयासाठी आवश्यक कोटा ३०३ मतांचा होता. गोकुळ गीते यांना ३५७ मते मिळाली, तर नरेंद्र दराडे यांना २४८ मतांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गोकुळ गीते यांना विजयी घोषित केले.

गोकुळ गीते हे मूळचे भाजपशी संबंधित मानले जातात. निवडणुकीपूर्वी त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी प्रचारातून माघार घेतल्याची घोषणा केली होती. मात्र त्यांचे नाव मतपत्रिकेवर कायम राहिले होते. निकालानंतर पराभूत उमेदवार नरेंद्र दराडे यांनी महायुतीतील काही घटक पक्षांवर गंभीर आरोप केले. "महायुतीतील घटक पक्षांनी गद्दारी केली असून काही नेत्यांनी अपक्ष उमेदवाराला पाठबळ दिले," असा दावा त्यांनी केला. विशेषतः जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे नाव घेत त्यांनी नाराजी व्यक्त केली. या निकालामुळे नाशिकसह राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. महायुतीतील अंतर्गत समन्वय, स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे आणि क्रॉस व्होटिंग याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.