धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला; संशयित रंगेहात पकडला

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या दाराशा रुग्णालय परिसरात भरदिवसा सोलर पॅनल, त्यासोबतचा लोखंडी पोल व संबंधित साहित्य चोरी करण्याचा धक्कादायक प्रयत्न उधळण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरणप्रेमी मनोज देवकर यांच्या सतर्कतेमुळे संशयिताला रंगेहात पकडण्यात आले असून त्याला सदर बझार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका गरजू रुग्णाच्या मदतीसाठी मनोज देवकर दाराशा रुग्णालयात गेले असता, रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ बसविण्यात आलेले सोलर पॅनल, लोखंडी पोल व इतर साहित्य उपसून एक व्यक्ती घेऊन जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्या वेळी रुग्णालयात डॉक्टर उपस्थित नव्हते. मात्र, तेथील मेट्रोन संगीता गुरव यांनी तातडीने सुरक्षा रक्षक व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने संबंधित व्यक्तीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. घटनेची माहिती मिळताच उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी तत्काळ संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला.

यावेळी प्रा. विजय लोंढे आणि मनोज देवकर यांनी सांगितले की, वीजपुरवठा खंडित झाल्यास रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरील उच्च क्षमतेच्या फोकस लाईटसाठी हे सोलर पॅनल वापरण्यात येते. अशा महत्त्वाच्या सार्वजनिक सुविधेची भरदिवसा चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून, संबंधित संशयिताने यापूर्वीही अशा प्रकारच्या चोरीच्या घटना केल्या आहेत का, याची चौकशी करण्यात येत आहे. तसेच सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षेसाठी रुग्णालय परिसरात अधिक कडक सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.