सोलापूर विधान परिषदेत भाजपचा दणदणीत विजय; राजेंद्र राऊत 365 मतांनी विजयी

सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे. मतमोजणीनंतर राऊत यांना एकूण 483 मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे उमेदवार वसंतराव देशमुख यांना 118 मते मिळाली. त्यामुळे राजेंद्र राऊत यांनी 365 मतांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला.

या निवडणुकीत एकूण 13 मते अवैध ठरली. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील ही निवडणूक राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची मानली जात होती. विजयानंतर प्रतिक्रिया देताना राजेंद्र राऊत यांनी विरोधकांवर नाव न घेता निशाणा साधला. निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र काही नेत्यांच्या अहंकारामुळे निवडणूक लढवावी लागल्याचे त्यांनी म्हटले. "इतका इगो आणि मुझे गिनो" अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली होती, असा टोला त्यांनी लगावला. तसेच, विरोधकांनी जर इतका आत्मविश्वास होता तर स्वतःच्या घरातील उमेदवार उभा करायला हवा होता, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे मोहिते-पाटील गटावर टीका केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे सोलापूरच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

भाजपने या विजयासह सोलापूर जिल्ह्यातील आपले राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांचा मोठा पाठिंबा मिळाल्याचे या निकालातून स्पष्ट झाल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) साठी हा निकाल धक्कादायक मानला जात असून आगामी स्थानिक आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने हा निकाल महत्त्वाचा मानला जात आहे.