मोबाईल न दिल्याच्या रागातून १३ वर्षीय मुलाची आत्महत्या; मोहोळ गावात हळहळ
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात एका १३ वर्षीय
मुलाने मोबाईल वापरू न दिल्याच्या रागातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली
आहे. पेनुर गावात १ मार्च रोजी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. या प्रकारामुळे
संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलाचे वडील शेतकरी असून कुटुंबात मोबाईल वापरण्यावरून वाद झाला.
“अभ्यास कर, मोबाईल वापरू नको,” असे
घरच्यांनी सांगितल्यानंतर मुलगा संतापाच्या भरात घरातील खोलीत गेला. काही वेळानंतर
तो बाहेर न आल्याने कुटुंबीयांना संशय आला. दरवाजा आतून बंद असल्याने कुटुंबीयांनी
लोखंडी रॉडच्या साहाय्याने कडी तोडून आत प्रवेश केला असता मुलाने साडीच्या
साहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. तातडीने त्याला खाली उतरवून पेनुर येथील
खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले
असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात
आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल नाळे करीत
आहेत. १३ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून
गावभर शोककळा पसरली आहे. अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर पालकांनी मुलांशी संवाद
साधण्याची आणि त्यांच्या मानसिक स्थितीकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे