आजारी आईचा मृत्यू; ११ वर्षीय तन्वीने दाखवलं धैर्य, माऊलीला दिला मुखाग्नी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील तळेरे येथे घडलेल्या एका हृदयस्पर्शी घटनेने संपूर्ण परिसर हळहळला आहे. अवघ्या ११ वर्षीय तन्वी चव्हाण हिने आईच्या निधनानंतर अत्यंत धैर्याने तिच्या पार्थिवाला मुखाग्नी देत सर्वांना भावूक केले. तळेरे येथील वाघाची वाडी परिसरात राहणाऱ्या संदीप चव्हाण यांच्या पत्नी प्रियांका चव्हाण या गेल्या अनेक महिन्यांपासून दुर्धर आजाराशी झुंज देत होत्या. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने वडील कामावर जात असताना घरातील जबाबदाऱ्या लहानगी तन्वीने सांभाळल्या. आईच्या आजारपणात घरातील कामे, स्वयंपाक, अभ्यास आणि शाळा यांचा समतोल राखत तन्वी आईला मानसिक आधार देत होती. ती तळेरे येथील वामनराव महाडिक विद्यालयात इयत्ता पाचवीत शिक्षण घेत असून, अभ्यासात हुशार आणि कलाक्षेत्राची आवड असलेली विद्यार्थिनी आहे. मात्र, आईचे निधन झाल्यानंतरही तन्वीने धैर्य न गमावता अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली. कुटुंबीय आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत तिने आपल्या आईच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. त्या वेळी तिचे थरथरणारे हात आणि अश्रूंनी भरलेले डोळे पाहून उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले. अत्यंत लहान वयात आलेल्या या कठीण प्रसंगाला तन्वीने दाखवलेल्या खंबीरपणाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. तिच्या धैर्याची चर्चा तळेरेसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत आहे.