सोलापुरात विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू; भगवा झेंडा लावताना घडली दुर्घटना
सोलापूर : शहरातील कुमठा नाका परिसरात दुर्दैवी घटना घडली असून, स्वागत कमानीवर भगवा झेंडा लावताना विजेचा धक्का बसून एका २४ वर्षीय
तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत तरुणाचे
नाव केतन पाटोळे (वय
२४, भारतनगर) असे असून, तो कुटुंबातील
कर्ता सदस्य होता. त्याच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला
आहे.
नेमकं काय घडलं?
स्वागतनगर रोड, यशवंत सोसायटी परिसरात गुरुवारी होणाऱ्या
कार्यक्रमानिमित्त मंडप आणि स्वागत कमान उभारण्यात आली होती. या कमानीवर झेंडा
लावण्यासाठी केतन वर चढला होता. झेंड्यासाठी वापरलेल्या कापडाला स्टीलचा पाइप
जोडलेला होता. कमानीजवळच उच्च दाबाच्या विजेच्या तारा होत्या. झेंडा लावताना स्टील
पाइपचा या विद्युत तारांशी संपर्क आला आणि केतनला जोरदार विजेचा धक्का बसला.
क्षणात सर्व काही संपलं
विजेचा धक्का बसताच केतन सुमारे २० ते २५ फूट उंचीवरून
खाली कोसळला. हा प्रकार पाहून उपस्थित नागरिक हादरले. त्याला तात्काळ शासकीय
रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
घरातील कर्ता तरुण गमावल्याने कुटुंबीयांवर शोककळा पसरली
आहे. आईला ही घटना सहन न झाल्याने तिची शुद्ध हरपल्याची माहिती आहे. रुग्णालय
परिसरात नातेवाईक आणि मित्रांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेमुळे शहरात हळहळ
व्यक्त होत असून, अशा प्रकारच्या कामांदरम्यान
सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.