उजनी धरणात १०३ टीएमसी पाणीसाठा; कर्नाटकाची सात टीएमसी पाण्याची मागणी, ३० ऑक्टोबरला निर्णय होण्याची शक्यता
सोलापूर : उजनी धरणातील पाण्याचे नियोजन करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे
राहिले आहे. धरणात सध्या एकूण १०३ टीएमसी पाणीसाठा असून, भीमा
नदीत पाणी सोडले जात असल्याने ऑक्टोबरअखेर साठ्यात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
अशा परिस्थितीत कर्नाटक सरकारने राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर
उजनी धरणातून सात टीएमसी पाणी सोडण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, सोलापूर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता धरणातील पाणी
राखीव ठेवण्याचे नियोजन आहे. त्यामुळे कर्नाटकच्या मागणीवर राज्य शासन काय निर्णय
घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उजनीच्या पाण्यावर अनेक योजना अवलंबून
उजनी धरणातून दरवर्षी जानेवारी ते मेअखेर शेतीसाठी किमान दोन आवर्तने
सोडली जातात. याशिवाय सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी भीमा नदीतून दरवर्षी १५
ते १८ टीएमसी पाणी सोडले जात होते. मात्र, समांतर जलवाहिनीमुळे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी
नदीतून पाणी सोडण्याची गरज कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बचत होणाऱ्या
पाण्यातून शेतीसाठी अतिरिक्त आवर्तन मिळेल, अशी शेतकऱ्यांना
अपेक्षा आहे. उजनी धरणावर सिंचनाच्या ११ योजना, साखर कारखाने
आणि औद्योगिक वसाहतींसह १५ ते १८ उद्योग, तसेच १०० हून अधिक
ग्रामपंचायती आणि विविध शहरांच्या पाणीपुरवठ्याच्या ४२ योजना अवलंबून आहेत.
त्यामुळे उपलब्ध पाण्याचा वापर पिण्यासाठी, शेतीसाठी आणि
उद्योगांसाठी कसा करायचा, याचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे.
कर्नाटकच्या सात टीएमसी मागणीवर राज्य शासनाचा निर्णय
कर्नाटक सरकारने उजनी धरणातून सात टीएमसी पाणी सोडण्याची मागणी करणारे पत्र सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविले आहे. आंतरराज्यीय पाणीवाटपाचा विषय असल्याने याबाबतचा अंतिम निर्णय राज्य शासनाच्या पातळीवर घेतला जाणार आहे. त्यापूर्वी उजनी धरणातील सद्यस्थिती, जिल्ह्याची पाण्याची गरज आणि आगामी काळातील संभाव्य परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. ‘टेल टू एण्ड’ तत्त्वानुसार धरणांमधील पाणीसाठा आणि पाणीवाटपाबाबत कर्नाटककडून मागणी केली जात असल्याचे सांगितले जाते. यापूर्वीही कर्नाटकाने उजनीतून पाणी सोडण्याची मागणी केली होती. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची गरज आणि शेतीसाठी आवश्यक पाण्याचा विचार करून निर्णय घेणे राज्य शासनासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
३० ऑक्टोबरच्या बैठकीत पाणी नियोजन निश्चित होणार?
उजनी धरणातील पाण्याचा पुढील आठ महिन्यांसाठी कसा वापर करायचा, याबाबत
३० ऑक्टोबर रोजी कालवा सल्लागार समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत पिण्याचे पाणी,
सिंचन आणि इतर गरजांसाठी पाणीवाटपाचे नियोजन अंतिम होण्याची शक्यता
आहे. लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता एस. एस. खांडेकर यांनी
दिलेल्या माहितीनुसार, धरणाची सद्यस्थिती आणि भविष्यातील
संभाव्य पाणीसाठ्याची माहिती राज्य शासनाला सादर करण्यात आली आहे. सोलापूर
जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन पाणी राखीव ठेवण्याचे नियोजन
आहे. त्यामुळे कर्नाटकच्या मागणीवर आणि उजनीतील पाणीवाटपावर ३० ऑक्टोबरच्या बैठकीत
काय निर्णय होतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे.