अक्कलकोटला स्वामी दर्शनासाठी निघालेल्या भारंबे कुटुंबावर काळाचा घाला; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

सोलापूर : सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळ तालुक्यातील शेटफळ गावच्या हद्दीत कार आणि कंटेनर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवारी (दि. ६ नोव्हेंबर) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. पार्थ तुषार भारंबे (वय ८), विलास चांगु भारंबे (वय ६६) आणि शोभा विलास भारंबे (वय ६३, सर्व रा. कल्याण, मुंबई) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे भारंबे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कार आणि कंटेनरची समोरासमोर धडक

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भारंबे कुटुंब इर्टिगा कारने कल्याणहून अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघाले होते. सोलापूर-पुणे महामार्गावरून प्रवास करत असताना मोहोळ तालुक्यातील शेटफळ गावच्या हद्दीत त्यांच्या कारची समोरून येणाऱ्या कंटेनरशी जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की कारचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला. या अपघातात कारमधील पार्थ, विलास आणि शोभा भारंबे यांचा जागीच मृत्यू झाला. अन्य दोघे गंभीर जखमी झाले.

नागरिकांकडून मदतकार्य; पोलिसांकडून तपास

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे सोलापूर-पुणे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मोहोळ पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.