मोबाईलमध्ये गुंग तरुणाचा चौथ्या मजल्यावरून पडून गंभीर अपघात
नाशिक : मोबाईलच्या आहारी गेलेल्या तरुणांमधील
बेफिकीरीचे आणखी एक धक्कादायक उदाहरण समोर आले आहे. भद्रकाली परिसरातील शिंगाडा
तलावाजवळील म्हसोबावाडीत राहणारा अरबाज सलीम खान (वय १७)
याचा भीषण अपघात झाला आहे. रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास अरबाज घराच्या
बाल्कनीत बसून मोबाईलवर इंटरनेट पाहत होता. मोबाइलमध्ये इतका गुंग झाला होता की,
आपण बाल्कनीच्या टोकावर बसलो आहोत, याचेही
त्याला भान राहिले नाही. अचानक तोल जाऊन तो चौथ्या मजल्यावरून खाली कोसळला.
खाली पडताना तो दुसऱ्या मजल्यावरील पत्र्याच्या शेडवर
आदळला. मोठा आवाज आणि त्याची आरोळी ऐकून शेजारील ध्रुगेश यादव यांनी तत्काळ धाव
घेतली. त्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अरबाजला तातडीने जिल्हा शासकीय
रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजत असून या
घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मोबाईल वापरताना सतर्क राहण्याचे
महत्त्व या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.