सोलापूरच्या ई-बस सेवेला गती देण्यासाठी महापौर विनायक कोंड्याल यांची आढावा बैठक; चार्जिंग स्टेशनची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन
विभागाची आढावा बैठक
सोलापूर शहरातील सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक सक्षम
आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर करण्याच्या दृष्टीने महापौर विनायक कोंड्याल यांच्या
अध्यक्षतेखाली सोलापूर महानगरपालिकेत परिवहन विभागाची आढावा बैठक पार पडली. या
बैठकीत ई-बस चार्जिंग स्टेशन, बुधवार पेठ येथील ई-बस डेपो, बस थांब्यांची उभारणी आणि सार्वजनिक परिवहन व्यवस्थेतील विविध सुविधांबाबत
चर्चा करण्यात आली. शहरातील राजेंद्र चौक बस डेपो आणि सात रस्ता बस डेपो येथेही
ई-बस चार्जिंग स्टेशन उभारण्याची शक्यता तपासण्याबाबत चर्चा झाली.
ई-बस चार्जिंग स्टेशनची कामे तातडीने पूर्ण करण्यावर भर
बैठकीत जेबीएम कंपनीमार्फत ई-बस चार्जिंग स्टेशन
उभारण्याचे काम तातडीने सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. कंपनीकडून पाच चार्जर
उपलब्ध करून देण्यात आले असून, चार्जिंग स्टेशनचे काम निर्धारित वेळेत
पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यावर भर देण्यात आला.
बुधवार पेठ ई-बस डेपोतील कामांना गती देण्याचे निर्देश
बुधवार पेठ येथील ई-बस डेपोतील प्रलंबित सिव्हिल कामे
सुरू करण्यासाठी लेबर मक्ता निश्चित करण्याबाबत निर्देश देण्यात आले. तसेच येत्या
८ ते १० दिवसांत कंपाउंड वॉलचे काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. काम
सुरळीतपणे पूर्ण करण्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून घेण्याबाबतही
बैठकीत चर्चा झाली.
बस थांबे आणि तिकीट प्रणालीच्या आधुनिकीकरणावर चर्चा
सोलापूर शहरातील ई-बस सेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी
पायाभूत सुविधांची कामे पूर्ण करणे, बस थांब्यांचे नूतनीकरण आणि तिकीट
प्रणालीचे आधुनिकीकरण यावर बैठकीत भर देण्यात आला. या कामांसाठी संबंधित विभागांनी
समन्वयाने पुढील कार्यवाही करावी, अशी भूमिका मांडण्यात आली.
बैठकीला पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित
या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती
रंजिता चाकोते, आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, नगरसेवक गौतम कसबे,
परिवहन विभागाच्या नियंत्रण अधिकारी सारिका अक्कलवार, कार्यकारी अभियंता राजेश परदेशी, नगर अभियंता नीलकंठ
मठपती, अग्निशामक विभागाचे प्रमुख राकेश साळुंखे, जेबीएम कंपनीचे प्रदीप उंबरकर, श्री ध्रुव, परिवहन व्यवस्थापक इराण्णा वन्यालोल्लू आणि कनिष्ठ अभियंता यंकटेश गुडसेलू
यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.