सोलापूर महापौरपदी विनायक कोंड्याल बिनविरोध : ज्ञानेश्वरी देवकर उपमहापौर

सोलापूर: सोलापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी अपेक्षे प्रमाणे भारतीय जनता पक्षाचे विनायक कोंड्याल यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर् उपमहापौर पदी ज्ञानेश्वरी देवकर यांची निवड झाली आहे. शिवसेनेने आपले अर्ज मागे घेतल्याने कोंड्याल यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, महापालिकेवर पुन्हा एकदा भाजपचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.  महापौर पदासाठी राजकीय हालचालींना वेग आला होता. भाजपचे विनायक कोंड्याल यांच्या विरोधात शिवसेना (शिंदे गट) कडून प्रियदर्शन साठे आणि एमआयएम (MIM) कडून तौफिक हात्तुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे निवडणूक होणार की काय? अशी चिन्हे दिसत होती. मात्र, ऐनवेळी राजकीय समीकरणे बदलली आणि शिवसेना तसेच एमआयएम या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला. दोन प्रमुख प्रतिस्पर्ध्यांनी माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली आणि पीठासीन अधिकाऱ्यांनी विनायक कोंड्याल यांची अधिकृत घोषणा केली. या बिनविरोध निवडीमुळे महायुतीमधील समन्वय दिसून आला असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी हा मोठा राजकीय विजय मानला जात आहे.