साखरपुड्याच्या प्रवासात काळाचा घाला; अमळनेरजवळ भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर-धुळे रस्त्यावर मंगरूळजवळ मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण तिहेरी अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मोटरसायकल, कार आणि एसटी बस यांच्यात झालेल्या या अपघातामुळे काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेरहून धुळ्याकडे जाणारी एसटी बस आणि मोटरसायकल मार्गावर असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारची दोन्ही वाहनांना जोरदार धडक बसली. धडकेची तीव्रता इतकी होती की मोटरसायकलचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.

या अपघातात मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तसेच कारमधील महिला आणि पुरुष प्रवाशांसह एकूण सहा जणांचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये गुजरातमधील व्यारा येथील नागरिकांचा समावेश असून ते साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी अमळनेरकडे येत असल्याचे सांगितले जात आहे. अपघाताची माहिती मिळताच डायल ११२ यंत्रणा, पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली बचावकार्य हाती घेण्यात आले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.

अपघातानंतर कारमध्ये एक लहान मुलगा अडकून पडल्याचे आढळून आले. गावकरी, पोलीस कर्मचारी आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याची सुटका करण्यात आली. तसेच एसटी बसमधील दीपक दिलीप पाटील हेही जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.