सोनम वांगचुक यांच्या उपोषणावरून न्यायालयात याचिका; ‘दोन दिवसांत जीवाला धोका’ असल्याचा दावा
शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक हे दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान गेल्या १८ दिवसांपासून बेमुदत उपोषण करत आहेत. त्यांच्या प्रकृतीत सातत्याने बिघाड होत असल्याचा दावा करत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून सक्तीने अन्न पुरविण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. ही जनहित याचिका कार्यकर्ते आणि वकील राकेश कुमार सैनी यांनी दाखल केली आहे. याचिकेनुसार, उपोषण सुरूच राहिल्यास वांगचुक यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला आवश्यक निर्देश देण्याची विनंती न्यायालयाकडे करण्यात आली आहे.
आंदोलनाच्या आयोजकांच्या माहितीनुसार, उपोषणादरम्यान सोनम वांगचुक यांचे सुमारे ८.५ किलो वजन घटले आहे.
त्यांचा रक्तदाब १०७/७० mmHg पर्यंत खाली आला
असून, रक्तातील साखरेची पातळी ६७ mg/dL
इतकी नोंदविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. आंदोलनस्थळी
डॉक्टरांचे पथक सातत्याने त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. उपोषणामुळे त्यांना
उभे राहणे, बसणे तसेच दैनंदिन हालचाली करतानाही त्रास होत
असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी
केंद्र सरकारने आंदोलकांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, वांगचुक
यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असून परिस्थिती चिंताजनक बनत आहे. देशाचे
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू
असलेल्या या आंदोलनाला NEET पेपरफुटी प्रकरणानंतर अधिक गती मिळाली आहे. आंदोलकांनी २० जुलै रोजी संसदेवर मोर्चा
काढण्याची घोषणा केली असून, न्यायालयाच्या निर्णयाकडे
सर्वांचे लक्ष लागले आहे.