महाराष्ट्रातील 'ज्ञानदूत' हरपला; पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन
कोल्हापूर : शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी कार्य करणारे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी राज्यपाल आणि
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉ. ज्ञानदेव यशवंतराव (डी. वाय.) पाटील यांचे
आज कोल्हापूर येथे वयाच्या ९०व्या वर्षी निधन झाले. मागील काही दिवसांपासून ते
आजारी होते. वृद्धापकाळामुळे प्रकृती खालावल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि समाजसेवा या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या दूरदृष्टीतून महाराष्ट्रासह देशभर अनेक शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या. लाखो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यात त्यांचे योगदान मोलाचे मानले जाते. राजकीय कारकिर्दीत त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केले. तसेच विविध शैक्षणिक संस्थांची स्थापना करून शिक्षणाची दारे सर्वसामान्यांसाठी खुली केली. त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना 'पद्मश्री' या प्रतिष्ठित नागरी पुरस्काराने गौरविले होते.
डॉ. डी. वाय. पाटील यांनी १९५७ ते १९६२ या कालावधीत कोल्हापूरचे महापौर म्हणून काम पाहिले. त्यानंतर १९६७ आणि १९७२ मध्ये पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले. सार्वजनिक जीवनात त्यांनी शिक्षण आणि विकासाला प्राधान्य देत उल्लेखनीय कार्य केले. त्यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्रासह राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात असून, बुधवारी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.