शेळगी ब्रिजवर एसटी-ट्रकची भीषण धडक; चालकासह दोघांचा मृत्यू, १० प्रवासी जखमी

सोलापूर : शहरातील मार्केट यार्डजवळील शेळगी ब्रिज येथे शुक्रवारी (३१ जुलै) पहाटे एसटी बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एसटी बसचे चालक आणि एका महिला प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून १० प्रवासी जखमी झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, आज पहाटे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस (क्रमांक MH 14 LB 0380) समोरून जाणाऱ्या ट्रक (क्रमांक MH 13 AX 3949) ला पाठीमागून जोरदार धडकली. धडक इतकी भीषण होती की बसचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातानंतर घटनास्थळी प्रवाशांच्या बॅगा आणि साहित्य रस्त्यावर विखुरलेले दिसून आले. या अपघातात एसटी बसचे चालक दादाराव भालचंद्र बनसोडे (वय ४३, रा. चिवरी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) आणि नागुबाई राम रेवगे (वय ४८, रा. अणदूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातात जखमी झालेल्यांमध्ये रामचंद्र प्रभाकर देवघे, विकास प्रकाश पाटील, माणिक नागप्पा वायचळ, रामलिंग ब्रह्मानंद कापसे, अभिषेक दीपक चव्हाण, अनिकेत सुभाष राठोड, अभिजीत अरुण चव्हाण, नागोराव किस्तू तोडसांग, अनुराधा अर्जुन चव्हाण आणि तुलसीदास मनोहर पाचंगे यांचा समावेश आहे. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच सोलापूर पोलीस, फॉरेन्सिक पथक आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.