सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; अक्कलकोट दर्शनाला निघालेल्या कुटुंबातील तिघांचा मृत्यू

सोलापूर-पुणे महामार्गावर कोंडी परिसरात सोमवारी दुपारी भीषण अपघाताची घटना घडली. अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी पुण्याहून निघालेल्या कुटुंबाच्या कारला धावत्या ट्रकची पाठीमागून जोरदार धडक बसल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेत दोन महिला आणि दीड वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सिंधू रवी खंडागळे (वय ४२), त्यांची बहीण नंदा भाऊराव हाताळकर (वय ४५) आणि दीड वर्षाचा रुद्राक्ष मोरे यांचा समावेश आहे. तर रुद्राक्षचे आई-वडील उमेश प्रकाश मोरे (वय ३२) आणि साक्षी मोरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील देहूरोड येथील रवी खंडागळे यांचे कुटुंब अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जात होते. कोंडी परिसरात भरधाव कारने पुढे जात असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. जखमींना तातडीने उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेषतः दीड वर्षाच्या रुद्राक्षच्या मृत्यूमुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. जखमी आई-वडील वारंवार आपल्या मुलाला पाहण्याचा आग्रह धरत असल्याचे हृदयद्रावक दृश्य रुग्णालयात पाहायला मिळाले. या प्रकरणाची नोंद सोलापूर सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.