सोलापूरजवळ साडेसहा कोटींचा गांजा जप्त; १३०९ किलो गांजासह एकाला अटक
सोलापूर : ओडिशातून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या गांजाच्या ट्रकवर
पुणे कस्टम्सच्या नार्कोटिक्स सेलने मोठी कारवाई केली आहे. सोलापूरपासून सुमारे १०
किलोमीटर अंतरावर पुणे-सोलापूर महामार्गावर संशयित ट्रक अडवून तब्बल १३०९.०२
किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. गुनुपूर, ओडिशा येथून मोठ्या प्रमाणात गांजाची
वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पुणे कस्टम्सच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.
त्यानंतर गुरुवारी मध्यरात्री महामार्गावर विशेष पाळत ठेवण्यात आली. यावेळी महिंद्रा
ट्रक क्रमांक एमएच १६ डीके ५५५६ संशयित आढळून आल्याने अधिकाऱ्यांनी तो
सोलापूरजवळ अडवला. ट्रकमध्ये गांजा रिकाम्या प्लास्टिक क्रेट्सखाली लपवून ठेवण्यात
आला होता.
वाहन, चालक आणि पंच साक्षीदारांना पुढील
कारवाईसाठी कस्टम्स सीएफआर कार्यालय, सोलापूर येथे आणण्यात
आले. नार्कोटिक ड्रग फील्ड टेस्टिंग किटद्वारे तपासणी केल्यानंतर जप्त केलेला
पदार्थ गांजा असल्याचे निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेल्या गांजाची अंदाजे किंमत ६.५४
कोटी रुपये आहे. गांजाच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रकही सीमा शुल्क
विभागाने जप्त केला आहे. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची
रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. हा गांजा नेमका कुठे नेला जात होता आणि या
तस्करीमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा सखोल तपास सीमा
शुल्क विभागाकडून सुरू आहे.