दुसऱ्या लग्नाला विरोध केल्याचा राग; वडिलांवर २० वर्षीय मुलीच्या हत्येचा आरोप, वडाळ्यात खळबळ
मुंबई : वडाळा परिसरातून संतापजनक घटना समोर आली आहे. दुसऱ्या
लग्नाला विरोध केल्याच्या रागातून २० वर्षीय मुलीची हत्या केल्याचा आरोप तिच्या ४५
वर्षीय वडिलांवर आहे. पोलिसांच्या तपासानुसार, आरोपीने मुलीच्या बिर्याणीत विष
मिसळल्यानंतर तिचा गळा आवळून हत्या केल्याचा संशय आहे. या प्रकरणी वडाळा पोलिसांनी
आरोपी वडिलांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शरीफ रझा हुसेन खान (वय ४५) हा वडाळा पूर्व परिसरात राहत असून
सुतारकाम करतो. नोव्हेंबर २०२५ मध्ये त्याच्या पत्नीचे कर्करोगामुळे निधन झाले
होते. त्यानंतर आरोपीला दुसरे लग्न करण्याची इच्छा होती. मात्र, त्याच्या २० वर्षीय मुलगी रिफत आणि १६ वर्षीय मुलगी नुजहत या दोघींचा
वडिलांच्या दुसऱ्या लग्नाला विरोध होता. या मुद्द्यावरून घरात वारंवार वाद होत
असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बिर्याणीत विष मिसळल्याचा आरोप
२ ऑक्टोबर रोजी आरोपी दोन्ही मुलींसाठी बाहेरून बिर्याणी
घेऊन आला होता. पोलिसांच्या तपासानुसार, या बिर्याणीत विष मिसळण्यात आल्याचा आरोप
आहे. बिर्याणी खाल्ल्यानंतर दोन्ही मुली घराच्या गच्चीवर झोपण्यासाठी गेल्या. दरम्यान,
उकाडा अधिक असल्याने १६ वर्षीय नुजहत गच्चीवरून निघून मावशीच्या घरी
गेली. त्यामुळे ती या घटनेतून बचावल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
सुरुवातीला फूड पॉइझनिंगचा संशय
३ ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे ५ वाजता आरोपी नातेवाईकांच्या घरी गेला आणि रिफत बेशुद्ध असून तिची कोणतीही हालचाल होत नसल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी रिफतला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. सुरुवातीला रिफतचा मृत्यू फूड पॉइझनिंगमुळे झाल्याचे भासवण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे. मात्र, रुग्णालयात मुलीला घेऊन आलेल्या वडिलांचे संशयास्पद वर्तन आणि तिच्या गळ्यावर आढळलेल्या वळांमुळे पोलिसांचा संशय बळावला.
शवविच्छेदन अहवालातून हत्येचा संशय
मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर रिफतचा मृत्यू गळा दाबल्यामुळे आणि श्वास गुदमरल्याने झाल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले. शवविच्छेदन अहवाल तसेच इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपास पुढे नेत आरोपी शरीफ रझा हुसेन खान याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास वडाळा पोलीस करत असून, हत्येमागील नेमका घटनाक्रम आणि विषारी पदार्थाबाबत अधिक तपास सुरू आहे.