भिवंडीत भीषण दुर्घटना! चार मजली इमारतीचा भाग कोसळला; तिघांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात चार मजली इमारतीचा भाग
कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. नारपोली परिसरातील भंडारी कंपाऊंड येथे असलेल्या
कोहिनूर इमारतीचा मोठा भाग गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास कोसळला. या
दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून अनेकजण
ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस आणि महापालिकेची पथके तातडीने
घटनास्थळी दाखल झाली असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. भिवंडी-निजामपूर
महानगरपालिकेच्या माहितीनुसार, कोहिनूर ही चार मजली इमारत
असून त्यामध्ये एकूण ४८ खोल्या होत्या. इमारतीला यापूर्वीच 'कॅटेगरी-सी'
अर्थात धोकादायक इमारत घोषित करण्यात आले होते. त्यामुळे बहुतांश
रहिवाशांनी इमारत रिकामी केली होती.
मात्र, एका कुटुंबाकडून इमारतीत दुरुस्तीचे काम
सुरू असताना अचानक मोठा भाग कोसळला. या दुर्घटनेत कामगारांसह काही जण मलब्याखाली
अडकल्याची माहिती आहे. बचावलेल्या नागरिकांची तात्पुरती व्यवस्था गायत्री
मंदिर-गीता हॉल येथे करण्यात आली असून बचावकार्य अद्याप सुरू आहे.