सिझेरियनचा खर्च करण्यास सासरच्यांचा नकार; ९ महिन्यांच्या गर्भवती स्वातीचा बाळासह मृत्यू, चौघांविरुद्ध गुन्हा

छत्रपती संभाजीनगर :

पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे ९ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा आणि तिच्या पोटातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गर्भावस्थेत २ तोळे सोन्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आल्याचा तसेच प्रकृती गंभीर असतानाही वेळेवर उपचार न मिळाल्याचा आरोप महिलेच्या वडिलांनी केला आहे. मयत महिलेचे नाव समीक्षा उर्फ स्वाती विशाल निंबाळकर (वय २६) असे आहे. या प्रकरणी तिचे पती विशाल अनिल निंबाळकर, सासरे अनिल रंगनाथ निंबाळकर, सासू शारदा अनिल निंबाळकर आणि नणंद ऐश्वर्या यांच्याविरुद्ध पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी दिला सिझेरियनचा सल्ला

स्वातीची ६ सप्टेंबर रोजी प्रकृती खालावल्याने तिला खासगी रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते. तपासणीत पोटातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याचे तसेच बाळाच्या गळ्याभोवती नाळ गुंडाळल्याचे निदर्शनास आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. परिस्थिती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तातडीने सिझेरियन शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, सिझेरियन आणि उपचारांचा खर्च करण्यास सासरच्या मंडळींनी नकार दिल्याचा आरोप स्वातीच्या वडिलांनी केला आहे.

उपचाराअभावी प्रकृती गंभीर

तक्रारीनुसार, स्वातीला वेळेवर आवश्यक वैद्यकीय उपचार न मिळाल्याने तिची प्रकृती आणखी बिघडली. २५ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ११.१० वाजता तिला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच स्वातीचा आणि तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

वडिलांच्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध गुन्हा

स्वातीचे वडील सदाशिव शंकर देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरून २९ सप्टेंबर रोजी पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी BNS कलम ८५, १०६(१) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. स्वातीचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला तसेच गर्भावस्थेत आवश्यक उपचार वेळेवर न मिळाल्याने तिचा आणि बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पाचोड पोलीस करत आहेत.